अमरावती,
bawankule-teacher-threats-sit-probeशिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्त्याने शिक्षकांना धमकावण्याचे प्रकार होत आहे. अशी संस्था व तेथील व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्यांना अजिबात सोडणार नाही. त्या संस्थेची एसआयटी चौकशी केली जाईल. धमक्या येत असेल तर शिक्षकांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी, त्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल, अशा शब्दात महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाव न घेता अनेकांना इशारा दिला.

महायुतीचे शिवसेना उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ वियज संकल्प मेळावा शुक्रवारी आयोजिण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर उद्योग मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ, खा. अनिल बोंडे, आ. संजय खोडके, आ. रवि राणा यांच्यासह पाचही जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार व प्रमुख पदाधिकारी हजर होते. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, गेल्या सहा वर्षात किरण सरनाईक यांनी पोटतिडकीने शिक्षकांचे प्रश्न मांडले. पुन्हा सरनाईक निवडून आले तर ते सत्तधारी राहणार आहे. त्यांची कामे झटपट होतील. त्यामुळे शिक्षकांनी सरनाईकांनाच आपली पहीली पसंती द्यावी. अफवा पसरविणे विरोधकांचे कामच असते. महायुतीत शंकचे वातावरण नाही. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळून काम करतील आणि सरनाईक विक्रमी मतांनी वियजी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री सामंत म्हणाले, महायुतीचे उमेदवार म्हणून सरनाईक यांच्याकडून संवादात काही अडचण झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. पण, नार्कोटेस्ट झाली तर प्रत्येकाच्या मनात महायुतीच्याच उमेदवाराचे नाव असले पाहीजे, अशी अपेक्षा आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची शपथ घेण्याचा आजचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. खा. बोंडे म्हणाले, नार्कोटेस्टची गरज नाही. फक्त विश्वासाची गरज आहे. कोणतीही अडचण नाही. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या संगीता शिंदे माझी बहीण आहे पण, पक्षाची भूमिका सर्वोच्च आहे. काँग्रेस शिक्षकांचा छळ करत असून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पदाचा गैरवापर करून संस्थेच्या शिक्षकांना वेठीस धरत असल्याचा आरोपी त्यांनी केला. याची तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आ. खोडके यांनी सरनाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. आ. राणा यांनी महायुतीचा धर्म पाळून सरनाईक यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावण्याचे आवाहन केले. मेळाव्याला मोठ्या संख्येने शिक्षक व कार्यकर्ते हजर होते.