चंद्रपूर,
chandrapur dhammachakra-miravnukधम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या दुसर्या दिवशीचा प्रारंभ शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत, अस्थिकलशासह भव्य मिरवणूकीने झाला. सकाळपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीच्या वाटेने निघाले होते आणि सायंकाळपर्यंत हा परिसर निळाईने फुलला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामुहिक बुध्द वंदनेने मिरवणुकीला सुरूवात झाली. त्यानंतर बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून जटपूरा गेट मार्गक्रमण करीत, मिरवणूक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून वरोडा नाका मार्गे दीक्षाभूमिवर पोहोचली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांचा अस्थिकलश बुद्ध विहारात जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीप्रती कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व संच या चमुच्या स्फुर्तीगीतांनी दीक्षाभूमीवर समस्त जनसमुह धम्ममय झाला.
यावेळी भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी दीक्षाभूमीवर उपस्थित बौध्दबांधवांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सामुहिक बुध्दवंदना आणि धम्मप्रवचन प्रसंगी भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदन्त सुमनवन्नो, भदन्त नागशेन, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त प्रज्ञाबोधी, भदन्त महानागा, भदन्त बुद्धादीप, भन्ते धम्मप्रिया आणि भिक्खूसंघ उपस्थित होते. सकाळी 11 वाजता ‘त्रिरत्न धम्मक्रांती आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद पार पाडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवी कांबळे, भदन्त डॉ. वण्णासामी, डॉ. जसबिरसिंग चावला, डॉ. आनंद भालेराव यांची उपस्थिती होती.