चुरू,
Death by heart attack on a treadmill राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथे जिममध्ये व्यायाम करताना ४९ वर्षीय मुख्याध्यापक बीरबलराम मेघवाल यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. मेघवाल हे आसपालसर गावातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गेले असताना ट्रेडमिलवर धावताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते खाली कोसळले. जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने मदत केली.
राजस्थान शिक्षक संघाचे महामंत्री विजय पोटलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरबलराम मेघवाल हे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या मुलीसोबत जिममध्ये गेले होते. व्यायाम सुरू केल्यानंतर सुमारे तासाभराने ट्रेडमिलवर धावताना ते अचानक खाली पडले. त्यांना तातडीने सरदारशहर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. चंद्रभान जांगिड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन विभागात आणले तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर बुधवारी कुटुंबीयांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
ट्रेडमिलवरून पडताना झालेली दुखापत मृत्यूचे कारण ठरली की त्यापूर्वीच काही वैद्यकीय समस्या उद्भवली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता काही स्थानिकांकडून व्यक्त केली जात असली, तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मूळचे नीमरासर गावचे रहिवासी असलेले बीरबलराम मेघवाल सध्या पत्नी आणि दोन मुलींसोबत सरदारशहर येथे राहत होते. आसपालसर येथील त्यांची शाळा सरदारशहरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.