पुण्यातील आयटी इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी खळबळ

वडिलांच्या तक्रारीनंतर तपासाला वेग

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
पुणे,
Death of an IT engineer in Pune पुण्यातील खराडी परिसरात २२ वर्षीय आयटी इंजिनिअर शिखर कुमार गौरव सक्सेना याच्या मृत्यूप्रकरणाला वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर नवे वळण मिळाले आहे. पोलिस असल्याचे भासवून ड्रग्ज आणि मुलींशी संबंधित कथित गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या धमक्यांद्वारे पैशांची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अजय कुमार भाटिया आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. तो २९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.
 
 
 
Death of an IT engineer in Pune
 
शिखर बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध सुरू असतानाच, ३० सप्टेंबर रोजी त्याचा लॅपटॉप, मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्याच्या पीजी निवासस्थानीच असल्याचे आढळले. त्याचा मोबाइल क्रमांक आईच्या मोबाइलवर हस्तांतरित करण्यात आला होता. त्यामुळे शिखरला येणारे फोन त्याच्या आईला मिळत होते. याचदरम्यान एका व्यक्तीने फोन करून शिखर ड्रग्जशी संबंधित गैरकृत्ये करत असल्याचे आणि मुलींशी संबंधित प्रकरणांतही त्याची वर्तणूक चुकीची असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे भासवल्याचा आरोप आहे. शिखरच्या बेपत्ता होण्याबाबत खराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी खराडीतील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या २७व्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
 
 
शिखरच्या अंत्यसंस्कारानंतर त्याचे वडील कुमार गौरव सक्सेना (वय ४६, रा. हरिद्वार, उत्तराखंड) यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अजय कुमार भाटिया हा शिखरला वारंवार फोन करून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आणि त्यातून त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या धमक्यांचा आणि शिखरच्या मृत्यूचा संबंध असल्याचा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. धमक्यांमागील नेमके कारण काय होते, पैशांची मागणी झाली होती का आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध खराडी पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.