गोंदिया,
gondia-highway-four-laning-projectsगोंदिया जिल्ह्यातील बालाघाट टी पॉईंट येथे एलिव्हेटेड रोटरी, कोहमारा-घोटी व घोटी-गोंदिया मार्गाच्या चौपदरीकरण व भंडारा जिल्ह्यातील रखडलेल्या व रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने खासदार प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वनविभागाच्या अधिकार्यांशी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील रस्ते व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी खासदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

बालाघाट टी पॉईंट परिसरातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता या ठिकाणी एलिव्हेटेड रोटरी उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कोहमारा ते घोटी दरम्यान असलेल्या वनक्षेत्राबाहेरील रस्त्यांच्या भागांची तपासणी करून त्या भागाचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्याबाबत तसेच घोटी ते गोंदिया या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करून विभागाला पाठविण्यात यावा. रस्ते विकासाच्या प्रस्तावांमध्ये वनक्षेत्रात येणार्या सर्व भागांसाठी वनविभागाशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे व वन विभागाकडून मंजुरी मिळविण्याच्या दृष्टीने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना खा. पटेल यांनी दिल्या.
त्यातच गोंदिया शहराचा वाढता व्याप व लोकसंख्येचा विचार करून वाढती वाहतूक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता शहरासाठी बाह्य वळणमार्ग (बायपास) प्रस्तावित करण्याच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासणी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील रखडलेली तसेच प्रलंबित रेल्वे उड्डाणपुलांची कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबींचा निपटारा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. सोबतच खा. पटेल यांनी भंडारा जिल्ह्यातील भंडारा व तुमसर- बपेरा-खापा व अन्य विकासकामांशी संबंधित विविध अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्यांना आवश्यक उपाययोजना आणि प्रस्तावांच्या कार्यवाहीबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधून प्रलंबित कार्य निकाली काढण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वनविभागाच्या अधिकार्यांशी दिल्या.