श्रीनगर,
jk-infiltration-threatव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर घुसखोरीसाठी अंदाजे ५०० दहशतवादी तयार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिवाळ्यात बर्फ पडताच हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करू शकतात. यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दरवर्षी हिवाळ्यात बर्फ पडल्यानंतर दहशतवादी सक्रिय होतात.
गेल्या काही वर्षांमध्ये नियंत्रण रेषेवर गस्त वाढली असल्याने घुसखोरी करणे दहशतवाद्यांना सोपे राहिले नाही. भारतीय जवानांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी हे दहशतवादी छोट्या छोट्या गटांमध्ये विभागले गेले आहेत. एक गटात तीन ते चार सदस्य आहेत. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून बर्फाळ आणि उंच भागांमध्ये वापरण्यासाठी विशेष उपकरणे पुरवण्यात आली आहेत.
घुसखोरीच्या तळांच्या आसपास पाकिस्तानी सैन्य तैनात असून, ड्रोनच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या हालचाली आणि घुसखोरीच्या मार्गावर नजर ठेवली जात असल्याचा दावा केला जात आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील हिंसक संघर्षांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना सहकार्य करीत असल्याचा अंदाज भारतीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.