वृद्ध दाम्पत्याची हत्या अन् दरोडा; २६ वर्षीय केअरटेकरसह प्रियकराला जन्मठेप

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Lover gets life sentence along with caretaker वांद्रे पश्चिम येथील उच्चभ्रू निवासी संकुलात २०१८ मध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या करून दरोडा टाकल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने केअरटेकर पार्वती खाका (२६) आणि तिचा प्रियकर सिंहासन एक्का (२६) यांना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी हा निकाल दिला. नानक मखिजानी (८५) आणि दया मखिजानी (८१) यांच्या हत्येसह दरोड्यादरम्यान दुखापत केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप ठोठावण्यात आली. याशिवाय, पार्वतीला नोकर म्हणून चोरी केल्याबद्दल सात वर्षांची सक्तमजुरी, तर एक्काला घरात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत. सरकारी पक्षाने दोघांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती; मात्र हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या श्रेणीत मोडत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने ती मागणी फेटाळली. परिस्थितीजन्य पुराव्यांचे स्वरूप, कारागृहातील आरोपींचे वर्तन आणि त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता यांचाही न्यायालयाने विचार केला.
 
 
mi,nai
 
 
वांद्रे पश्चिम येथील ‘एकता एलीट, कोकिलकुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मध्ये नानक आणि दया हे वृद्ध दाम्पत्य एकटेच राहत होते. त्यांची मुले आणि इतर कुटुंबीय परदेशात स्थायिक झाले होते. घटनेच्या अवघ्या १५ दिवस आधी पार्वती पूर्णवेळ केअरटेकर म्हणून त्यांच्या घरी कामाला लागली होती. २१ जून २०१८ रोजी घरातील मोलकरीण सुरेखा साबळे हिने फ्लॅटचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने तिने वॉचमन विमलेश यादव यांना माहिती दिली. त्यानंतर भागवत, यादव, समरंजन मोंगा आणि सुरेखा यांनी फ्लॅटकडे धाव घेतली. इमारतीतील स्वच्छता कर्मचारी सुभाष खेतले याने स्वयंपाकघराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून मुख्य दरवाजा उघडला. घरात नानक आणि दया मृतावस्थेत आढळले. त्यांचे हात आणि गळे ओढणीने बांधलेले होते, तर दयाच्या पायाजवळ रक्ताने माखलेली उशी पडली होती. कपाटे उघडी असून घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. घरातून सुमारे १० लाख रुपये किमतीचे कृत्रिम, चांदीचे आणि सोन्याचे दागिने तसेच नऊ हजार रुपये रोख चोरीला गेले होते. पोलिसांनी २२ जून २०१८ रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरून पार्वती आणि एक्का यांना अटक केली. त्या वेळी दोघेही गीतांजली एक्सप्रेसने ओडिशाच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांच्याकडून दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. २१ जून रोजी पहाटे ५ वाजून १९ मिनिटांनी काढलेली दादर-झारसुगुडा रेल्वेची दोन तिकिटेही पोलिसांना मिळाली.
 
या खटल्यात सरकारी वकील केशव साळुंखे यांनी ३५ साक्षीदारांचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रण, वैद्यकीय निष्कर्ष, जप्त केलेल्या वस्तू आणि आरोपींचे वर्तन या बाबींचा विचार करून न्यायालयाने निर्णय दिला. ब्युटी पार्लरच्या मालकीण सुयहा चिन यांनी दिलेल्या साक्षीनुसार, घटनेच्या काही तास आधी, २० जून रोजी पार्वती दयासोबत त्यांच्या सलूनमध्ये आली होती. रिक्षाचालक लवकुश राजभर यानेही पार्वती आणि एक्का यांना ओळखले. त्याने दोघांना दादरला जाण्यासाठी रिक्षा केल्यानंतर वांद्रे पुलाजवळ सोडले होते. सरकारी पक्षाने ‘लास्ट सीन थिअरी’च्या आधारे आरोपी गुन्ह्याच्या आधी संबंधित व्यक्तींसोबत असल्याचे सिद्ध केल्याचे न्यायालयाने नमूद केले. स्वयंपाकघराच्या खिडकीतून तिसरी व्यक्ती घरात आली असावी, हा बचाव पक्षाचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळला. ओडिशामध्ये आई आजारी असल्याचे समजल्याने आपण निघून गेलो आणि वृद्ध दाम्पत्याने परवानगीसह दोन हजार रुपये दिले होते, असा दावा पार्वतीने केला होता. एक्कानेही तत्सम बचाव मांडला. मात्र, पार्वतीनेच एक्काला मुंबईत बोलावून फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवून दिला होता आणि दोघे निघून जाताना त्यांनी इतर कोणालाही याची माहिती दिली नव्हती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.