वाशीम,
gopal-kabra सौर ऊर्जेचा वापर केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित न ठेवता त्यातून स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेदरम्यान विशेषतः युवक आणि महिलांना सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींची माहिती देऊन त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. एक हजारांहून अधिक इच्छुक उद्योजकांना सक्षम करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जेच्या वापरासाठी केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने अनेक प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या आहेत, या यात्रेमुळे सरकारी योजनांनाही चालना मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतीपथावर असून, भारतात दुसर्या स्थानी असल्याची माहिती जीके एनर्जीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा यांनी दिली.

सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासह या क्षेत्रातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १८ ऑटोबर २०२६ या कालावधीत ही यात्रा १४ जिल्ह्यातून जात आहे. शुक्रवारी ही यात्रा वाशीम येथे पोहोचली. येथील एका हॉटेल मध्ये आयोजित मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घरगुती छतावरील (रुफटॉप) सौर यंत्रणा, व्यावसायिक सौर प्रकल्प, सौर कृषिपंप, ऊर्जा साठवण, यंत्रणा बसविणे, देखभाल आणि वितरण अशा विविध क्षेत्रांतील संधींची माहिती देण्यात येत आहे. तसेच विक्री, सेवा आणि तांत्रिक कामांसाठी स्थानिक पातळीवर व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन केले जाईल.
सौर ऊर्जेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर उद्योजकांचे जाळे निर्माण करून स्थानिक रोजगार वाढविणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा प्रसार वेगाने करणे, हा या यात्रेमागील व्यापक दृष्टिकोन आहे. या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांना शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जाणार आहे, असेही आयोजकांनी कळवले आहे.