नवी दिल्ली,
McGrath's record in Shami's sights भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यासमोर २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या नावावर असलेला विश्वचषकातील सर्वाधिक बळींचा विक्रम शमी मोडू शकतो. मॅकग्राने एकदिवसीय विश्वचषकाच्या ३९ सामन्यांत ७१ बळी घेतले आहेत. त्याने १९९६ ते २००७ या कालावधीत चार विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याच्या कौशल्यामुळे त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांसमोर मोठे आव्हान उभे केले. अनेक वर्षांपासून कायम असलेला त्याचा हा विक्रम आता शमीच्या कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.
मोहम्मद शमीने आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकातील १८ सामन्यांत ५५ बळी मिळवले आहेत. त्यामुळे मॅकग्राच्या विक्रमापासून तो १६ बळी दूर आहे. विशेष म्हणजे, तुलनेने कमी सामने खेळून शमीने ही कामगिरी केली आहे. २०२३ चा विश्वचषक त्याच्यासाठी अत्यंत संस्मरणीय ठरला होता. या स्पर्धेत त्याने अवघ्या सात सामन्यांत २४ बळी घेतले आणि सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने सात बळी मिळवले होते. शमीच्या या प्रभावी गोलंदाजीने भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२०२७ च्या विश्वचषकात मॅकग्राचा विक्रम मोडण्यासाठी शमीला आणखी किमान १७ बळी मिळवावे लागतील. त्याने ही कामगिरी केल्यास एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा मान त्याला मिळू शकतो. मात्र, आगामी विश्वचषकासाठी शमीची भारतीय संघात निवड होईल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीपासून ते संघातील स्थानापर्यंतच्या घडामोडींवर चाहत्यांचे लक्ष राहणार आहे. शमीला २०२७ च्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यास त्याच्यासमोर वैयक्तिक विक्रमासह विश्वचषकाच्या इतिहासात आपले नाव कोरण्याचे मोठे लक्ष्य असेल.