वर्धा,
mh-drought-relief-5000-advance-aidभीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर दाटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनाबरोबरच उद्योगांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांचे अग्रीम अर्थसाहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. दुष्काळग्रस्त परिस्थितीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कर्जमाफीचा मार्ग मोकळा करून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असल्याचे गाते यांनी नमूद केले आहे.

दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीकरिता तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सक्त तंबी दिली असून पिण्याचे पाणी आणि पुरेसा चारा उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजनांद्वारे दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी करून फडणवीस सरकारने एक आदर्श उभा केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात आली असून जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा याकरिता चारा देणाऱ्या पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन जनावरांना जगविण्याची हमी सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांनीही दुष्काळाचा सामना करण्यासाठी हातात हात घालून सरकारला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील दुष्काळी स्थिती ही नैसर्गिक आपत्ती आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज असताना या प्रश्नांवर विरोधकांकडून केले जाणारे राजकारण दुर्दैवी आहे, अशी खंत गाते यांनी व्यक्त केली. राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देऊन सरकारने कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पेलली आहे.