नागपूर,
nagpur-doctor-wins-mrs-united-nationsआंतरराष्ट्रीय सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व स्पर्धा ‘मिसेस युनायटेड नेशन्स २०२६’मध्ये नागपूरच्या डॉ. श्रुती नीरज सवालाखे यांनी विजेतेपद पटकावत भारताचा गौरव वाढवला. नवी दिल्लीतील रोहिणी परिसरातील क्राउन प्लाझा येथे आयोजित या स्पर्धेत त्यांना ‘मिसेस युनायटेड नेशन्स’ हा किताब प्रदान करण्यात आला. यासोबतच त्यांनी ‘मिसेस युनायटेड नेशन्स अर्थ’ हा प्रतिष्ठेचा किताबही मिळवला. डॉ. श्रुती सवालाखे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच कॉस्मेटोलॉजी आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे हे यश आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक मानले जात आहे.

डॉ. श्रुती या डॉ. रवी चरडे यांच्या कन्या असून डेंटल सर्जन आणि कॉस्मेटोलॉजिस्ट आहेत. त्यांनी कॉस्मेटोलॉजीमधील दोन फेलोशिप पूर्ण केल्या असून हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवी संपादन केली आहे. सध्या त्या नागपूर येथील जय इन्स्टिट्यूट आणि भानुकृपा हॉस्पिटलमध्ये संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेतील यशानंतर डॉ. श्रुती यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी स्वतःच्या स्वप्नांनाही प्राधान्य दिले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू जय सवालाखे यांच्या त्या आई आहेत. सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट असलेले त्यांचे पती डॉ. नीरज सवालाखे आणि कुटुंबीयांचे सहकार्य त्यांच्या यशाच्या प्रवासात महत्त्वाचे ठरले. महिलांनी कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच स्वतःची स्वप्नेही पूर्ण करावीत, असा संदेश डॉ. श्रुती देतात. प्रत्येक भूमिकेला समान वेळ देणे म्हणजे समतोल नव्हे, तर प्रत्येक जबाबदारी तिच्या गरजेनुसार प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजे खरा समतोल होय, असे त्यांचे मत आहे.
स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आपल्यासाठी विशेष अनुभव असल्याचे डॉ. श्रुती यांनी सांगितले. त्यांच्या सादरीकरणात ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारतीय तिरंग्यापासून प्रेरित देशभक्तिपर संकल्पनेला विशेष महत्त्व देण्यात आले होते. या माध्यमातून साहस, देशप्रेम आणि भारतीय अस्मितेचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून पुरस्कार आणि सन्मानांपेक्षाही माणुसकी, संवेदनशीलता आणि करुणा जपणे महत्त्वाचे असल्याचे त्या मानतात. गरजू व्यक्तींना मदत करणे आणि कठीण प्रसंगी इतरांच्या पाठीशी उभे राहणे, हेच खऱ्या यशाचे लक्षण असल्याचे त्यांचे मत आहे.
स्पर्धेदरम्यान एका परदेशी स्पर्धकाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच डॉ. श्रुती यांनी डॉक्टर म्हणून तिला मदत केली. त्यांच्या या कृतीतून वैद्यकीय सेवेची बांधिलकी केवळ रुग्णालयापुरती मर्यादित नसून गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले.
त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ पुरस्कार आणि सन्मान मिळवणे नव्हे, तर आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी करणे होय. डोक्यावरील मुकुट व्यक्तिमत्त्वाला तेज देतो; मात्र माणुसकी मनामनांत प्रकाश निर्माण करते, हीच त्यांच्या प्रवासाची प्रेरणा आहे.
या आंतरराष्ट्रीय यशानंतर वैद्यकीय कौशल्य, नेतृत्वक्षमता आणि वैयक्तिक अनुभवांच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाची प्रेरणा निर्माण करण्याचा डॉ. श्रुती यांचा मानस आहे. महिला सक्षमीकरण आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमांमध्येही योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे.
महिलांनी वय, परिस्थिती किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांना स्वतःच्या क्षमतेची मर्यादा मानू नये, असा संदेश त्या देतात. एखादी महिला स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे येते, तेव्हा ती केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तर पुढील पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते. त्यामुळे हा मुकुट केवळ यशाचे प्रतीक नसून समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याची जबाबदारी असल्याची भावना डॉ. श्रुती व्यक्त करतात.