वैवाहिक जीवनाचा विचार करता बलात्काराचा गुन्हाही रद्द करता येतो : हायकोर्ट
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news प्रेमसंबंधानंतर पळून जाऊन लग्न केले. मात्र, लग्नाच्या वेळी मुलगी अल्पवयीन होती. त्यामुळे समाज आणि कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन युवकावर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. मात्र, मुलीने १८ वर्षे पूर्ण होताच त्याच प्रियकरासोबत संसार थाटला. या प्रकरणात न्यायालयाने दोघांच्या वैवाहिक आयुष्याचा विचार करीत युवकावरील सर्व गुन्हे रद्द केले. ‘समाजाने मारले पण प्रेमाने तारले’ असा काहीसा अनुभव उच्च न्यायालयात आला.
कौशिक आणि अंजली (काल्पनिक नावे) हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. एकाच गावातील असल्यामुळे दोघांची कॉलेजमध्ये ओळख झाली. दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. कौशिकने तिला लग्नाची मागणी घातली. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी नकार दिला. १७ वर्षे ११ महिने वय असतानाच कौशिकने अंजलीला पळवून नेले आणि एका मंदिरात लग्न केले. दुसरीकडे अंजलीच्या पालकांनी समाजात बदनामी झाल्यामुळे समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या सांगण्यावरून अल्लीपूर पोलिस ठाण्यात कौशिकवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांचाही शोध घेतला आणि अल्पवयीन अंजलीला ताब्यात घेतले. तिच्या पालकांच्या तक्रारीवरून कौशिकविरुद्ध अपहरण, बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल केले. कौशिकची रवानगी कारागृहात झाली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले.
दोघांचे पुन्हा पलायन
अंजलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कौशिक हा जामिनावर कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या. एकमेकांशिवाय जगू शकणार नाही, अशी खात्री पटताच दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पुन्हा पलायन केले. पालकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही अन्य राज्यात स्थायिक झाले. दुसरीकडे पोलिसांनी तपास करून न्यायालयात प्रकरण पाठवले.
दोन वर्षांचा मुलगा आणि सुखी संसार
कौशिक आणि अंजलीला दोन वर्षांचा मुलगा आहे. त्यांचा संसार सुखाने सुरू आहे. दोघेही एका व्यवसायात गुंतले आहेत. चांगली कमाई आणि घर-गाडी असे सुखी जीवन जगत असताना कौशिकवर मात्र बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल होते. त्यामुळे सामाजिक बदनामी आणि भविष्यात गुन्हेगार म्हणून ओळख कायम राहणार होती. त्यातून बाहेर निघण्यासाठी दोघांची धडपड सुरू होती.
वैवाहिक भविष्याचा विचार
एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्यासाठी कौशिकने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात अंजली दोन वर्षांच्या मुलासह हजर झाली. अंजलीने विवाह आणि मुलासह सुखी संसार सुरू असल्याचा दावा केला. न्यायालयाने वैवाहिक भविष्याचा विचार केला. प्रेमाचे नाते पुढे विवाहबंधनात अडकले. दोघेही सध्या पती-पत्नी म्हणून एकत्र राहत असून त्यांना एक मुलगाही आहे. संबंधित महिला आणि तिच्या मुलाच्या भविष्याचाही न्यायालयाने विचार केला. फौजदारी कारवाई सुरू राहिल्यास त्यांच्या कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. या बदललेल्या परिस्थितीचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित एफआयआर, आरोपपत्र आणि त्याअनुषंगाने सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द केली.