‘त्वं हि दुर्गा’ युवती संमेलनात १२०० हून अधिक युवतींचा सहभाग

महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि नेतृत्व विकासाचा संदेश

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
नागपूर
abvp अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), नागपूर महानगराच्या वतीने शुक्रवारी झाशी राणी चौकातील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात भव्य ‘त्वं हि दुर्गा – दशप्रहरण धारिणी’ युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ‘सा शक्तिः, सा प्रेरणा, सा नेतृत्वम्’ या संकल्पनेवर आधारित या संमेलनात १२०० हून अधिक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि नेतृत्व विकासाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
 
abvp
संमेलनाचे उद्घाटन एमईआरसीच्या न्यायिक सदस्य कल्पना तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी अभाविपच्या माजी राष्ट्रीय मंत्री तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शालिनी वर्मा, उच्च न्यायालयातील अधिवक्ता ऋतुजा कुलकर्णी, विहिंपच्या मातृशक्ती सहसंयोजिका भाम्यश्री हरडे, अभाविपच्या महानगर उपाध्यक्ष डॉ. मेधा कानिटकर, महानगर छात्रा प्रमुख खुश्बू, पश्चिम नागपूर जिल्हा संयोजक तनु समुद्रे आणि बुटीबोरी नगरमंत्री लक्ष्मी वर्धने यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय संस्कृती आणि आधुनिकतेचा समन्वय आवश्यक
संमेलनाच्या प्रमुख वक्त्या शालिनी वर्मा यांनी विकसित भारत २०४७ ची संकल्पना केवळ तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून, त्यामध्ये भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक ओळख यांचाही समावेश असणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजची नारी घराच्या अंगणापासून अंतराळापर्यंत मजल मारत असून, महिलांनी सांस्कृतिक ओळख जपत विज्ञानासह विविध क्षेत्रांत नवी शिखरे गाठणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांमध्ये संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि परस्पर सन्मानाची भावना रुजविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संमेलनात पंचपरिवर्तन, कुटुंबव्यवस्था, पर्यावरण संरक्षण, स्वावलंबन, लोकशाही मूल्ये, सामाजिक समरसता, महिला सुरक्षा आणि नागरिक कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवतींना केवळ सहभागी म्हणून नव्हे, तर समाजातील नेतृत्वकर्त्या म्हणून घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. विविध महाविद्यालयांतील युवतींनी शोभायात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. युवतींच्या मोठ्या सहभागामुळे संमेलनाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.