मोर्शी,
pinglai-devi-temple-navratri-crowdमोर्शीपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या व अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या श्री क्षेत्र गोरळा येथील पिंगळाई देवी गडावर शारदीय नवरात्री उत्सवाच्या सहाव्या माळेला १६ ऑक्टोबर रोजी भाविक भक्तांची गर्दी उसळली. आई पिंगळाई मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक गडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

वाढत्या गर्दीचे नियोजन करताना पिंगळाई देवी सार्वजनिक ट्रस्टने दर्शन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या व्यवस्थेमुळे भाविकांना दिलासा मिळत आहे. शारदीय नवरात्रोत्सवात पिंगळा देवी गडावर दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी असते. नवरात्रातील प्रत्येक माळेला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दररोज वाढत असून सहाव्या माळेला पिंगळाई गडावर विशेष गर्दी पाहायला मिळाली. कुटुंबासह आलेले भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होत होते. शारदीय नवरात्री उत्सवादरम्यान येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनरांगांचे नियोजन करण्यात आले आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवणे, प्रवेशमार्ग सुरळीत ठेवणे आणि आवश्यक ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे, यावर भर देण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शन व्यवस्थेत शिस्त राखण्याबरोबरच गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शारदीय नवरात्र उत्सवाला दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची भरपूर व्यवस्था पिंगळाई देवी ट्रस्टने केली आहे.