अनिल कांबळे
नागपूर,
police-raid मसाज पार्लरच्या आड देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार सदरमधील मंगळवारी परिसरात उघडकीस आला. पोलिसांनी एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून बाहेरील राज्यांतील तीन तरुणींची सुटका केली. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय स्तरावर जोडले असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारवाईदरम्यान मसाज सेंटरची संचालिका आणि एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती सदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही दिवस या सेंटरच्या हालचालींवर लक्ष ठेवले. माहितीची खातरजमा करण्यासाठी गुरुवारी रात्री नियोजनबद्ध पद्धतीने एका पंटरला ग्राहकाच्या वेशात सेंटरमध्ये पाठविण्यात आले. पंटरकडून ठरलेला संकेत मिळताच पोलिसांनी सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत तेथून तीन तरुणींची सुटका करण्यात आली. या महिलांचे वय अंदाजे २२ ते ३० वर्षांदरम्यान असल्याचे सांगण्यात आले. त्या बाहेरील राज्यांतील असून, त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त केले जात होते काय़?, याचा तपास पोलिस करीत आहेत.
या प्रकरणात मसाज सेंटरची संचालिका आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाइल आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केलेली नव्हती. या रॅकेटचे जाळे अन्य राज्यांपर्यंत पसरले आहे का, तसेच या तरुणींना नागपुरात कोणामार्फत आणण्यात आले, याचा तपास आता पोलिस करीत आहेत. या कारवाईमुळे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.