अमरावती,
raja-bangde-yuva-swabhiman-amravatiयुवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती येथील जयभारत मंगलम् येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भव्य पदग्रहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पंकज ऊर्फ राजा बांगडे यांची युवा स्वाभिमान पार्टीच्या अमरावती शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आमदार रवी राणा यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अन्य पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. आमदार राणा यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जनसेवेचे महत्त्व पटवून दिले.
पदाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी करावा. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
नियुक्तीनंतर राजा बांगडे यांनी आमदार राणा यांचे आभार मानत शहरातील प्रत्येक प्रभागात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करून जनतेचा विश्वास संपादन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सोहळ्यात महानगरप्रमुखपदी नितीन बोरेकर, प्रदेश प्रवक्तेपदी बाळू इंगोले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अनुप अग्रवाल, युवा मोर्चा शहराध्यक्षपदी सूरज भारत चौधरी, कामगार युनियन शहराध्यक्षपदी करण डेढवाल, व्यापारी आघाडी शहराध्यक्षपदी संजय मुनोत आणि शहर प्रवक्तेपदी सागर लोखंडे यांच्यासह विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठराव कात्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नवले, उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.