‘शेतकरी बचाव’चा चामोर्शीत ‘रास्ता रोको’

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
चामोर्शी,
save-the-farmers-protest-road तालुक्यातील शेतकरी बचाव जनआंदोलन समिती भेंडाळा परिसर व महिला समिती यांच्या वतीने 15 ऑक्टोबरला चामोर्शी येथील लक्ष्मी गेट चौकात दुपारपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शुक्रवारी, 16 ऑक्टोबरला देखील सुरू आहे. आंदोलनास्थळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. परंतु आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. यावेळी भूसंपादन कायदा रद्द करण्यासह विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये गडचिरोली येथे झालेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी शेतकर्‍यांना लेखी आश्‍वासन दिले होते की, हरकती नोंदविण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याशिवाय भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार नाही.
 
 
save-the-farmers-protest-road
 
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पत्रदेखील देण्यात आले होते. मात्र, या आश्‍वासनाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच फराडा, वेलतूर व रीठ या गावांतील शेतकर्‍यांना जनसुनावणीसाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री व सहपालकमंत्री, जिल्हा प्रशासन व शेतकरी प्रतिनिधी यांची सामूहिक बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी, सामूहिक बैठक होईपर्यंत जनसुनावणी स्थगित ठेवावी, शासनाला भूसंपादनासंदर्भात जनसुनावणी घ्यावयाची असल्यास प्रथम बाधित शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी सामूहिक बैठक आयोजित करावी, शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता तसेच त्यांच्या हरकती व मागण्यांवर निर्णय न घेता जनसुनावणीची प्रक्रिया पुढे राबवू नये, फराडा, वेलतूर व रीठ या गावांसाठी नियोजित जनसुनावणी सामूहिक बैठक होईपर्यंत स्थगित ठेवावी, शेतकर्‍यांच्या हरकतींचा गांभीर्याने विचार केल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, भेंडाळा परिसरातील 14 गावांतील शेतकरी आपल्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत.
 
 
शेतजमीन हे शेतकर्‍यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने शेतकर्‍यांच्या हरकतींचा योग्य विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आमदार डॉ. नरोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. जनसुनावणीला स्थगिती देण्याचे आश्‍वासन आमदारांनी दिले व मुख्यमंत्र्यांसोबत 1 नोव्हेंबरला बैठक लावण्याचे आश्‍वासनही दिले. तरीदेखील आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नसून आंदोलन सुरूच आहे. यावेळी आमदारांसोबत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व तहसीलदार हजर होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.