tadoba वाघांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा आनंद आता नियोजनबद्ध रेल्वे पर्यटनातून घेता येणार आहे. भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाच्या (आयआरसीटीसी) पश्चिम विभागाने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या सहकार्याने ‘वनदर्शन-निसर्ग जाणून घ्या, वन्यजीव ओळखा’ या विशेष वन्यजीव पर्यटन उपक्रमाची घोषणा केली आहे.
या उपक्रमामुळे ताडोबाच्या जंगलातील वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक अधिवास जवळून अनुभवण्याची संधी वन्यजीवप्रेमी, निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि कुटुंबांना मिळणार आहे. रेल्वे प्रवासासोबत सफारीचे नियोजन एकाच पॅकेजमध्ये केल्यामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
‘वनदर्शन’ उपक्रमात पाच वेगवेगळ्या पर्यटन सहलींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पासोबत बोर व्याघ्र अभयारण्य, ताडोबासोबत नवेगाव-नागझिरा व्याघ्र अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्पासोबत उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्य, ताडोबासोबत उमरेड-पवनी-करांडला अभयारण्य आणि ताडोबासोबत टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य अशा पाच सहलींचा समावेश आहे. या पर्यटन कार्यक्रमांमधून पर्यटकांना ताडोबासह विविध वनक्षेत्रांतील जैवविविधता अनुभवता येणार आहे. प्रत्येक पॅकेजसाठी चढण्याची आणि उतरण्याची रेल्वे स्थानके स्वतंत्रपणे निश्चित करण्यात येणार आहेत.
* प्रस्थान : दर गुरुवारी मुंबईहून विदर्भ एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१०५).
* परतीचा प्रवास : दर रविवारी गोंदिया येथून विदर्भ एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१०६).* सहलीचा कालावधी : चार रात्री, पाच दिवस.
रेल्वे तिकीट आणि सफारी परमिट
या पर्यटन पॅकेजचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पॅकेजच्या अटींनुसार रेल्वे तिकीट आणि जंगल सफारीसाठी प्रवेश परवाना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था. रेल्वे प्रवास, निवास, स्थानिक वाहतूक आणि सफारीचे नियोजन एकत्रित केल्यामुळे पर्यटकांना अधिक सुलभ आणि आरामदायी अनुभव मिळणार आहे. प्रत्येक फेरीसाठी वातानुकूलित तृतीय श्रेणीत (थ्री एसी) सहा बर्थ आणि वातानुकूलित द्वितीय श्रेणीत (टू एसी) सहा बर्थ उपलब्ध असतील. जागा मर्यादित असल्याने इच्छुक पर्यटकांनी बुकिंगपूर्वी संबंधित पॅकेजच्या अटी आणि उपलब्धता तपासणे आवश्यक आहे.