प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार

अनेकदा शारीरिक संबंध; लग्नाचा विषय काढताच धमकी

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
teacher-sexually-assaulted गिट्टीखदान परिसरातील एका नामांकित इंग्रजी शाळेतील शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पोलिसांनी एका तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सम्यक राजेंद्र वाकपैजन (२५), रा. बाबादीपसिंगनगर, कपिलनगर परिसर, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिका आणि सम्यक यांची ओळख झाली. सम्यक हा एका खासगी बँकेत नोकरीला आहे. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
 
 
teacher-sexually-assaulted
 
आरोपी सम्यकने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर काटोल मार्गावरील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही काळानंतर शिक्षिकेने आरोपीकडे विवाह करण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने लग्न करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर याबाबत तगादा लावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ६९ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम ६९ हे फसवणुकीच्या मार्गाने किंवा लग्न करण्याचा हेतू नसताना दिलेल्या आश्वासनाच्या आधारे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याशी संबंधित आहे, तर कलम ३५१(२) हे गुन्हेगारी धमकीशी संबंधित आहे. या प्रकरणासंदर्भात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.