वरुडातील बुट हाऊसला भीषण आग

१५ लाखांचे नुकसान

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
वरुड, 
warud-shoe-shop-fire-15-lakh-lossवरुड शहरातील स्थानिक धनगवळी बाबा मंदिर परिसरातील भाजीपाला बाजारातील सैनिक बुट हाऊस या दुकानाला शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानासह माल जळून खाक झाला. अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या आगीच्या झळा लगतच्या भाजीपाला दुकानाला बसल्याने त्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे.
 
 
varud
 
शहरातील स्थानिक महात्मा गांधी चौक परिसरात भाजी बाजारातील दुकानांमध्ये माजी सैनिकांच्या मुलांचे सैनिक बुट हाऊस नावाने चपला, जोडे विक्रीचे दुकान १५ ते २० वर्षांपासून सुरू होते. शुक्रवारी सकाळी साडेसहा दरम्यान रहदारी करणाऱ्या नागरिकांना अचानक दुकानातून धूर निघताना दिसला. त्यामुळे या आगीची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने घटनास्थळी काही वेळ चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
 
 
यावेळी वरुड, शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु, तोपर्यंत दुकानातील मालाची राखरांगोळी झाली होती. या आगीत भवानी भाजीपाला विक्री दुकानाला झळा बसल्याने या दुकानदाराचेसुद्धा आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत सैनिक बुट हाऊसचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून वृत्त लिहिस्तोवर आगीचे नेमके कारण कळू शकले नव्हते.