अनिल कांबळे
नागपूर,
husband-threatened-with-murder शेजारच्या वादातून एका महिलेचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्याची, तसेच तिच्या पतीची हत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी चंद्रकांत लाखणे (४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार ४१ वर्षीय महिला एकाच परिसरात राहतात. आरोपीला मद्यपानाची सवय असून, ९ ऑक्टोबर रोजी तो महिलेच्या घरासमोर मद्यप्राशन करून गोंधळ घालत होता. यावेळी महिलेने आणि तिच्या पतीने त्याला समजावून सांगत उपद्रव थांबविण्याचा प्रयत्न केला.

याचाच राग आरोपीच्या मनात असल्याचा आरोप आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी महिलेच्या घराजवळ आला. त्याने तिला अश्लील शिवीगाळ केली. पुन्हा आपल्याविरुद्ध बोलल्यास बलात्कार करण्याची धमकी दिली. तसेच अश्लील हावभाव करीत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारानंतर महिलेने नंदनवन पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विनयभंग, धमकी आणि जाणूनबुजून अपमान करण्यासंदर्भातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.