कारवाईचा ठराव आठ महिन्यांपासून धूळखात
गोंदिया,
mla-rahangdale-by-panchayat-samiti-members गोरेगाव पंचायत समितीअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) अभियान व्यवस्थापकाविरोधात महिलांशी अभद्र वर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी पंचायत समितीच्या सभेत आठ महिन्यांपूर्वी कारवाईचा ठराव पारित करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी १४ ऑक्टोबर रोजी आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ग्रामीण महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून उमेद अभियान राबविले जाते. या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान, गोरेगाव येथील उमेद कार्यालयात एल. जी. लंजे हे तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून उमेद अभियानाशी संबंधित महिलांशी अभद्र वर्तन करण्यात आले तसेच अपशब्द वापरून त्यांना अपमानित करण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात संबंधित महिलांनी पंचायत समिती प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत अभियान व्यवस्थापक एल. जी. लंजे यांच्याविरोधात कारवाई करण्याचा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडेही पाठविण्यात आला होता.
मात्र, आठ महिने उलटूनही कारवाई झाली नसल्याने पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच ९ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीदरम्यान, लंजे यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने त्यांना याविषयी पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांनी विचारणा केली असता पदाधिकार्यांशीही त्यांनी अभद्र व्यवहार केल्याचा आरोप आमदारांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान, पं.स.सभापती चित्रकला चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे तसेच सदस्य राजकुमार यादव, शीतल बिसेन, नरेश पंधरे, नलिनी सोनवाने, मनोज बोपचे, शशिकला ताराम आणि किशोर पारधी यांनी आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. प्रकरणाची दखल घेऊन संबंधित व्यवस्थापकाविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे मात्र, उमेदचे अभियान व्यवस्थापक लंजे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून कोणत्याही महिलेशी अभद्र वर्तन केलेले नाही तसेच या संदर्भात कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.