राज्यात उन्हाच्या झळा की पावसाच्या सरी?

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
पुणे,
Yellow alert for Kolhapur-Solapur राज्यातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा वाढला असून ऑक्टोबर हिटचा तीव्र अनुभव येत आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राज्यातील काही भागांत वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 
hit
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेच्या निरीक्षणानुसार, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा ऑक्टोबरमधील उष्णतेची तीव्रता नेहमीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यांसह तुरळक पाऊस पडू शकतो. मात्र, हा पाऊस रब्बी हंगामासाठी पुरेसा किंवा समाधानकारक ठरेलच, असे नाही, असेही हवामान खात्याने नमूद केले आहे.
 
 
भारतीय हवामान विभागाने १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील अनेक शहरांचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. यवतमाळ येथे राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर रत्नागिरीमध्ये पारा ३८.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. रत्नागिरीतील तापमान सरासरीपेक्षा ५.७ अंशांनी अधिक होते. मुंबईतही उष्णतेची तीव्रता जाणवत असून बुधवारी कुलाबा येथे ३६.४ अंश, तर सांताक्रूझ येथे ३७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सांताक्रूझमधील तापमान सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी अधिक होते. त्यामुळे राज्यात एकीकडे उकाड्याचा त्रास कायम असताना दुसरीकडे काही भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याची गरज आहे.