प्रेयसीच्या डोक्यात दगड मारून तरुणाची मारहाण

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
young-man-assaults-girlfriend ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर संपर्क तुटलेल्या प्रेयसीला रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना गांधीबाग उद्यान परिसरात घडली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी पीयूष धर्मेंद्र देवगडे (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी आणि पीयूष यांची २०२० मध्ये महाविद्यालयात ओळख झाली होती. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, जुलै २०२३ मध्ये वाद झाल्यानंतर दोघांचे संबंध संपुष्टात आले.

young-man-assaults-girlfriend
त्यानंतर त्यांच्यात संपर्क नव्हता. १४ ऑक्टोबर रोजी तरुणी कामावर जात असताना पीयूषने तिला रस्त्यात अडविले. ती कुठे जात आहे?, अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पीयूषने तिला अश्लील शिवीगाळ केली आणि तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तरुणीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर ठोसे मारून हल्ला केल्याचा आरोप आहे. मारहाणीतून बचाव करण्यासाठी तरुणी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पीयूषने मागून तिच्या दिशेने दगड फेकून मारला. तो तिच्या डोक्याला लागल्याने ती जखमी झाली. तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.