उंबर्डा बाजार,
farmer-suffers-a-loss-of-one-lakh-rupees येथून जवळच असलेल्या ग्राम सुकळी येथील रात्रीच्या सुमारास एका शेतात अज्ञात व्यक्तीने ३ एकरातील सोयाबीनच्या गंजीला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत शेतकर्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत राख झाली आहे.
सविस्तर माहितीनुसार सुकळी येथील सर्वे नंबर ११५ मध्ये पीडित शेतकरी सुनिल वानखडे यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची सोंगणी पूर्ण केली होती. मळणी करण्यासाठी त्यांनी सर्व सोयाबीन एकत्र करून शेतातच एक मोठी गंजी (ढीग) रचून ठेवली असतांना रात्री सर्व आटोपून घरी परतले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गंजीला आग लावून दिली.
या आगीत सोयाबीनसह पिकाचा चारा (कुटार) देखील जळून नष्ट झाला आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्याचे या मानवनिर्मित संकटामुळे कंबरडे मोडले आहे. रात्रंदिवस घाम गाळून कमावलेले पीक डोळ्यांदेखत जळाले. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा आर्त सवाल पीडित शेतकर्याने केला असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतातील पिके जाळण्याच्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, अशा प्रवृत्तींच्या व्यक्तीवर कडक कारवाई करून अशा व्यक्तिचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नुकसानगस्त शेतकरी यांनी केली आहे.