बुलढाणा
poetry-symposium मराठी भाषा ही लोकभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक समृद्ध व्हावी, तसेच मराठी साहित्याचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी साहित्यिकांनी लोकांच्या भाषेत साहित्यनिर्मिती करावी आणि वाचकांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी. मराठी भाषा व साहित्य टिकविण्यासाठी समाजाच्या सहभागातून व्यापक लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. कमलेश खिल्लारे यांनी केले.
बुलढाणा ग्रंथोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित ‘मराठी : लोकभाषा व ज्ञानभाषा’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी केवळ साहित्यनिर्मिती पुरेशी नसून, ते साहित्य समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य आणि भाषा ही समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीची महत्त्वाची साधने असून, त्यांच्या संवर्धनासाठी साहित्यिक, वाचक आणि समाजातील विविध घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. परिसंवादात डॉ. प्रदीप बारळ यांनी विविध साहित्यिक दाखले देत मराठी भाषेच्या लोकभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून होणार्या वाटचालीवर प्रकाश टाकला. आपल्याकडे असलेला ज्ञानाचा समृद्ध साठा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील सामर्थ्य, गोडवा आणि अभिव्यक्तीची समृद्धता यांचा प्रभावी वापर करून ज्ञानाची देवाणघेवाण मराठीतून व्हावी, असे त्यांनी सांगितले.
महेंद्र बोर्डे यांनी मराठी भाषेचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या विचारविश्वाची, परंपरेची आणि सांस्कृतिक ओळखीची वाहक आहे. त्यामुळे भाषेचे महत्त्व ओळखून तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. किरण डोंगरदिवे यांनी मराठी भाषेचा इतिहास, सद्यस्थिती आणि साहित्याच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन या विषयांवर विचार मांडले. ग्रंथसंपदा आणि साहित्यामुळे सांस्कृतिक वारसा जतन होण्यास मदत होते. व्यक्तीचे विचारविश्व आणि विवेक समृद्ध करण्यासाठी पुस्तकवाचनाला पर्याय नाही. वाचनाचा छंद केवळ आवड न राहता जीवनाची गरज बनला पाहिजे. मराठी भाषेतील ज्ञानसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचनसंस्कृती रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रंथोत्सवाच्या दुपारच्या सत्रात आयोजित कवी संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रमेश आराख होते. गोविंद रहाटे, सुरेश इंगळे, वैशाली तायडे आणि विशाल खोंदले यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. विविध विषयांवरील कवितांमधून सामाजिक जाणीवा, जीवनानुभव आणि साहित्यिक अभिव्यक्तीचे दर्शन घडले. विशाल मोहिते यांनी कवी संमेलनाचे निवेदन केले. दोन दिवसीय बुलढाणा ग्रंथोत्सव २०२६ च्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कि. वा. वाघ होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे, संजय बनसोड, देविदास समुद्रवार, विष्णू इंगळे, रफीक कुरेशी, सुनील झोरे, पंढरीनाथ सानप, रामेश्वर गायकी, सुरेखा हिस्सल आणि प्रभाकर घुगे उपस्थित होते. ग्रंथोत्सवाच्या यशस्वितेसाठी अजय शिरसाठ, कैलास गव्हाळे, शेषराव भिरडे, राजाराम देवकर, धनंजय मरे आणि संतोष मिश्रा यांनी परिश्रम घेतले.