अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर पालिकेचा हातोडा

नोटीस देऊनही काम सुरू ठेवल्याने कारवाई

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
मुंबई
Ajay Devgn बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच, आता मुंबई महापालिकेने त्याच्या जुहू येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. बांधकाम थांबविण्याची नोटीस देऊनही काम सुरूच ठेवल्याने पालिकेने बंगल्यातील काही भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.
 

Ajay Devgn Juhu Bungalow: BMC Takes Action Against Alleged Illegal Construction 
अजय देवगणचा मुंबईतील जुहू परिसरात कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. या बंगल्यात अंतर्गत बदल करणे, विभाजनाच्या भिंती उभारणे, खिडक्यांमध्ये बदल करणे तसेच इतर बांधकामे करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. महापालिकेच्या परवानग्या न घेता हे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने संबंधित बांधकामाबाबत नोटीस बजावली होती.
मुंबई महापालिकेने १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ३५४ अ अंतर्गत ही नोटीस दिली होती. संबंधित बांधकाम तातडीने थांबवावे, तसेच आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर कराव्यात, असे स्पष्ट निर्देश नोटिशीत देण्यात आले होते. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्याचा आरोप आहे. पालिकेच्या सूचनेला अजय देवगण याच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
नोटीस देऊनही काम Ajay Devgn  थांबविण्यात आले नाही आणि बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली नसल्याने अखेर महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार बंगल्यातील अनधिकृत असल्याचा आरोप असलेल्या बांधकामाचा काही भाग पाडण्यात आला. या कारवाईमुळे अजय देवगणच्या बंगल्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
अजय देवगण या बंगल्यात आपल्या कुटुंबीयांसह राहतो. एकीकडे पान मसाल्याच्या जाहिरातीवरून एफडीएकडून नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आले असताना, दुसरीकडे बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अभिनेता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.