पित्याला मुखाग्नी देण्यापूर्वीच पुत्राने सोडले प्राण

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
ब्रम्हपुरी, 
brahmapuri-father-son-tragedyमृत पित्याच्या अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडण्यापूर्वीच त्यांच्या पुत्राला हृदयविकाराचा झटका आला आणि पित्याच्या पाठोपाठ पुत्रानेही जगाचा निरोप घेतला. हा हृदयद्रावक प्रसंग ब्रह्मपुरी शहरातील बोंडगाव वॉर्ड येथे घडला. नामदेव पंढरी तूपट आणि तुळशीदास नामदेव तूपट अशी मृत पिता, पुत्राची नावे आहेत.
 
 
ram
 
ब्रह्मपुरी शहरातील बोंडगाव वॉर्ड येथील रहिवासी नामदेव तूपट यांना कोमल व तुळशीदास ही दोन मुले आहेत. त्यांनी शेतात राबराब राबून दोघांनाही स्वतःच्या पायावर उभे केले. कोमल हा मोठा मुलगा गावातच राहून शेती व मजुरी करतो. तर तुळशीदास हा लहान असून, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, त्याची पत्नीसुद्धा धामणी (जिल्हा अमरावती) येथ शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
 
 
काही दिवसांपूर्वी तुळशीदास यांना आपल्या आईची प्रकृती बरी नसून ती अंथरुणाला खिळली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच बोंडगाव येथील आपले घर गाठत आई व कुटुंबीयांची भेट घेतली आणि घरी दोन दिवस मुक्काम केला. दोन दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर अचानक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नामदेव तूपट यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळच्या सुमारास वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच तुळशीदास यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी लगेच घरातील एका सहकार्‍याला सोबत घेऊन ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालय गाठले.
 
 
परंतु, रुग्णालयातच हृदयविकाराचा तिव्र झटका येऊन क्षणातच तुळशीदास यांनी जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही प्राण सोडल्यामुळे तूपट कुटुंबासह संपूर्ण बोंडगाव परिसरात शोककळा पसरली. पित्याच्या पार्थिवावर दुपारी 1 वाजता, तर त्यांच्या मुलाच्या पार्थिवावर रात्रीच्या सुमारास बोंडेगांव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील जाण्याचा विरह आणि आघात सहन न झाल्यामुळेच मुलानेही प्राण त्यागल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.