२३ ऑक्टोबरला पंतप्रधान करणार ‘चिन्मय’च्या संमेलनाचे उद्घाटन

२५ देशांतील प्रतिनिधींचा सहभाग

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
मुंबई,
chinmaya-mission-75th-anniversaryचिन्मय मिशनच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित जागतिक अमृत महोत्सवी संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनात २५ देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार असून, भारतीय वेदांतज्ञानाचा आधुनिक जीवनाशी संबंध जोडण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
 

5hj
 
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी स्वरूपानंद यांनी संमेलनाची माहिती दिली. स्वामी चिन्मयानंद यांनी भारतीय संस्कृती, उपनिषदे, भगवद्गीता आणि वेदांताचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. चिन्मय मिशनच्या माध्यमातून बालविहार, युवकांसाठी मार्गदर्शन, मूल्याधारित शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबविले जातात. भगवद्गीतेतील पाच श्लोकांच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकास, सकारात्मक विचार आणि भावनिक स्थैर्य वाढविण्यासाठी ‘गीता पंचामृत’ उपक्रम राबविला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
 
आजच्या काळात मानसिक संतुलन आणि भावनांचे व्यवस्थापन महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा समन्वय साधण्याची गरज असल्याचे स्वामी स्वरूपानंद यांनी अधोरेखित केले. या जागतिक संमेलनात आध्यात्मिक प्रवचने, विचारमंथन, भजनसंध्या, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे संगीतकार रिकी केज यांच्या विशेष सादरीकरणाचाही समावेश असेल. चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.