पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोहळेंना विजयी करा : मुख्यमंत्री फडणवीस

वर्धेत पदवीधर संवाद मेळावा

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
वर्धा,
devendra-fadnavis-sudhakar-kohale-nagpur-electionमहाराष्ट्रात महायुतीचे सरकार भकम उभे आहे. राज्यात दोन तृतियांश बहुमत आहे. पदवीधर निवडणुकीचा थेट राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार नसला तरी पदवीधरांचे प्रश्न शासनदरबारी मांडून ते सोडवून घेण्यासाठी नागपूर पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 

sudhakr
 
स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे आज १७ रोजी नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमीत वानखेडे, आ. संजय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, माजी खासदार सुरेश वाघमारे, सागर मेघे, अविनाश देव, सचिन अग्निहोत्री, प्रदीप बजाज, वैभव काशीकर, कमलाकर निंभोरकर, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सरकारमध्ये बसुन शिक्षक, पदवीधर, डॉटर, इंजिनिअर, वकिलांचे प्रश्न पोहोचवू शकेल आणि सरकार त्याला प्रतिसाद देईल असा आमदार हवा आहे. अपवाद सोडला तर ५० वर्षे या मतदार संघावर भाजपाचेच आमदार निवडून आले आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत कोरोना काळात नोंदणी कमी झाल्याने आपल्याला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यातून आपण शिकलो आणि साधवही झालो. आता गेल्या दोन अडीच वर्षात चांगली नोंदणी झाली. काँग्रस महाविकास आघाडी पेक्षा भाजपा महायुतीने जास्त नोंदणी केली. तो आपण पहिला विजय प्राप्त केला. त्या विजयाने आपण घरी बसलो तर आपल्याला पुन्हा घरी बसण्याची वेळ येईल. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. वर्धा जिल्हा भाजपासोबत आजपर्यंत उभा राहत आला आहे. आताही कोहळे यांना आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, सागर मेघे, आ. संजय भेंडे, माजी खासदार रामदास तडस, अनिल सोले, सुधीर कोठारी, राजेश सराफ, विजय आगलावे यांनीही मार्गदर्शन केले.