धापेवाडा सिल्कला जागतिक बाजारपेठ मिळवून देणार!

४०० महिलांच्या सहभागातून हातमाग उद्योगाला नवी संजीवनी

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
नागपूर,
dhapewada-silk-sarees-handloom-industryविदर्भातील पारंपरिक हातमाग उद्योगाला पुनरुज्जीवित करून धापेवाड्याच्या सिल्क साड्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा संकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. धापेवाडा टेक्सटाईल उद्योगाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि हँडलूम उद्योगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 

dhape
 
धापेवाडा टेक्सटाईल इंडस्ट्री प्रोड्युसर कंपनीची स्थापना सुमारे ४०० महिलांच्या सहभागातून करण्यात आली आहे. हा प्रकल्प कोणत्याही एका व्यक्तीच्या फायद्यासाठी नसून समाजाच्या विकासासाठी उभारण्यात आला आहे. महिलांना रोजगार, पारंपरिक विणकरांना काम आणि स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
 
धापेवाड्यातील हातमाग उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी २०२१ पासून प्रयत्न सुरू आहेत. पूर्ती ॲग्रोने या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली. सध्या येथे एका साडीच्या निर्मितीसाठी सुमारे दहा दिवस लागतात. या साडीची किंमत जवळपास १२ हजार रुपये आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक डिझाइन आणि कलात्मकता यामुळे या साड्यांना बाजारपेठ मिळवून देण्याची मोठी संधी असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
 
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने सुरुवातीला ५० साड्या खरेदी केल्यानंतर आणखी मागणी केली होती. मात्र, मर्यादित उत्पादनक्षमतेमुळे मागणी पूर्ण करता आली नाही. सध्या दरमहा सुमारे १०० साड्यांचे उत्पादन होत असून, बाजारपेठेतील संभाव्य मागणी लक्षात घेता उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
 
आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने उत्पादनाचा कालावधी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, उत्पादन वाढविताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. साड्यांसोबतच धोतर, जॅकेट आणि अन्य वस्त्रांची निर्मितीही या प्रकल्पातून केली जाणार आहे.
 
धापेवाड्यातील हातमाग उद्योग एकेकाळी गावाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता. अनेक घरांमध्ये हातमाग सुरू असायचे; मात्र कालांतराने हा व्यवसाय बंद पडत गेला. त्यामुळे विणकरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. ही पारंपरिक कला पुन्हा उभी करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन उत्पादन आणि विक्रीची व्यवस्था निर्माण केली जात आहे.
 
शेतात काम करणाऱ्या महिला आणि आदिवासी भागातील महिलांनाही परवडणाऱ्या दरात चांगल्या साड्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कमी किमतीतील वस्त्रनिर्मितीचाही विचार करण्यात येत आहे. केवळ कमी किंमत म्हणजे कमी गुणवत्ता, असा समज करून घेऊ नये. दर्जेदार वस्त्रे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हाही या उपक्रमाचा उद्देश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
 
पाचगाव येथे गारमेंट उद्योगातील उरलेल्या कापडापासून कार्पेट आणि गालिचे तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. या माध्यमातून सुमारे १२०० ते १५०० महिलांना रोजगार मिळत असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. या उत्पादनांना कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांतूनही मागणी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 
गिरीराज सिंह
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या रोजगारनिर्मितीच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांमध्ये वस्त्रोद्योगाचा समावेश होतो. या क्षेत्रात तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरातून उत्पादनक्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विणकरांचे उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
 
संजय सावकारे
महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी धापेवाडा प्रकल्पाचे कौतुक केले. पारंपरिक वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उत्पादनासोबत प्रभावी मार्केटिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विणकरांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असून, २०० युनिटपर्यंतच्या वीजबिलासंदर्भातील प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. समर्थ योजनेला नव्या स्वरूपात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये ‘अर्बन हाट’च्या माध्यमातून बचत गट आणि स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक वस्तूंच्या विक्रीसाठी विमानतळांवरही जागा उपलब्ध करून देण्याची विनंती संजय सावकारे यांनी गडकरी यांना केली.