नागपूर
dhamma chakra pravartan din धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो अनुयायी दाखल होत असतात. अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम व सुखकर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा करण्यात येणारी तयारी अंतिम टप्प्यात आहे. मनपाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधांची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.१६) दीक्षाभूमी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणी दौऱ्यात मनपा आयुक्त डॉ. विपीन, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती तारा(लक्ष्मी) यादव, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरुबक्षाणी, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, उपायुक्त श्री. राजेश भगत, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, विधी अधिकारी श्री. सूरज पारोचे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, श्री. श्रीकांत वाईकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उपअभियंता श्री. राजीव गौतम, परिवहनचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. यात निवाऱ्याची व्यवस्था, २४ तास पाणी पुरवठा, दिवसरात्र सफाई कामगार, अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी नियंत्रण कक्ष तैनात केले जाणार आहेत. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेऊन घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, अग्निशमन व कायदा सुव्यवस्था चांगली राहील, या चार प्रमुख बाबींवर अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष लक्ष द्यावे तसेच मुलभूत सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
१२०० सफाई कर्मचाऱ्यांची सेवा, १४० नळांची व्यवस्था
दीक्षाभूमी परिसरामध्ये सतत स्वच्छता राखली जाईल यासाठी ठिकठिकाणी कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय तीन पाळीमध्ये एकूण १२०० स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दीक्षाभूमी मार्गावर पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी १४० नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), दीक्षाभूमी, पीकेव्ही, कुर्वेज हायस्कूल, बेझनबाग, अंबाझरी, व उंटखाना येथे 21 हजार व्यक्तींच्या निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय आपात्कालीन स्थितीमध्ये दीक्षाभूमी जवळील शाळांमध्ये निवारा व्यवस्था करण्यात येणार आहे.
आरोग्य सेवा 24 तास
दीक्षाभूमी येथील मुख्य मार्गावर आरोग्य तपासणी केंद्राची व्यवस्था केली आहे. याशिवाय डॉक्टरांचे पथक राहणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध राहणार आहे. काचीपुरा पोलीस चौकी, बजाजनगर पोलीस चौकी, लक्ष्मीनगर चौक, काँग्रेस नगर, ड्रॅगन पॅलनेस व चोखामेळा वसतिगृह जवळ फिरत्या दवाखान्याची सुविधा राहणार आहे. या केंद्रातील सर्व कर्मचार्यांची फोन क्रमांक सर्वांना शेअर केले जाणार आहे.
आकस्मिक काळात मनपाच्या शाळा
अचानक पाऊस आल्यास अनुयायांना थांबण्यासाठी मनपाच्या शाळांमध्ये व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी १८ ते २२ ऑक्टोबरपर्यंत मनपाच्या शाळ उपलब्ध राहणार आहे. दीक्षाभूमीवरील व्यवस्थेची माहिती देण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रमुख चौक, बस स्थानक रेल्वे स्टेशनमध्ये मार्गदर्शक सूचना देणारे मोठे फलक लावण्यात येईल.
कचरा रस्त्यावर नव्हे, कचराकुंडीतच टाका
दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व बौद्ध अनुयायांना सुविधा प्रदान करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. नागरिकांनी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी सेवारत राहणार आहेत. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्यावर अथवा इतरत्र कुठेही कचरा न टाकता तो परिसरातील कचरा कुंडीमध्येच टाकावे व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.