गडचिरोली,
chandrashekhar-bawankule जातीपातीने नव्हे, तर कर्तृत्वाने माणसे मोठी होतात. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कोहळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, महामंत्री गोविंद सारडा, प्रशांत वाघरे, डॉ. चंदा कोडवते, नगरसेवक सागर निंबोरकर, सुरेंद्रसिंह चंदेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, अभिजीत वंजारी यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे यावेळी सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पाठीशी असून, शेतकर्यांना कर्जमाफी आणि धानाला बोनस देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आगामी 2029 च्या विजयाची ही निवडणूक नांदी ठरेल. त्यामुळे कोहळे यांना विजयी करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारावी. गडचिरोली जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी आपण स्वतः जिल्ह्यात येत राहू, अशी ग्वाहीही बावनकुळे यांनी दिली.