कुपवाडाच्या नियंत्रण रेषेवर पुन्हा धुमश्चक्री!

३ ते ४ घुसखोरांच्या हालचालींची माहिती

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
श्रीनगर,
Firing at Line of Control in Kupwara जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरच्या जामगुंड परिसरात नियंत्रण रेषेवर (LoC) घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात गोळीबार सुरू झाला. पाकिस्तानच्या बाजूने घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला असून, दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांना आज पहाटे सुमारे ३ वाजता काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. अंदाजे तीन ते चार जणांचा गट भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी त्यांना आव्हान दिले. त्यानंतर गोळीबार सुरू झाला आणि सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.
 

Firing at Line of Control in Kupwara 
 
घटनेनंतर संबंधित परिसरात शोध आणि तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, तसेच घुसखोरांकडून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. भारतीय लष्कराकडून अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा असून, शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच घटनेचा सविस्तर तपशील समोर येण्याची शक्यता आहे. गोळीबार झालेला परिसर उंचावर आणि दुर्गम भागात असल्याने कारवाईदरम्यान आव्हाने निर्माण होत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यातही पूंछमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी निष्फळ ठरविल्याचे वृत्त होते. त्या कारवाईत अंदाजे चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांचे मृतदेह पाकिस्तानी सैनिकांनी परत नेल्याचे आणि या घटनेचे चित्रीकरण झाल्याचेही वृत्त आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पूंछमधील मागील घटनेत दहशतवाद्यांनी भारतीय सीमेजवळ आयईडी (IED) पेरण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराच्या घुसखोरीविरोधी यंत्रणेने त्यांच्याविरोधात कारवाई केल्याचे सांगण्यात आले. ही घटना पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील हाजिरा भागातील बदरपूर परिसरात घडल्याचे वृत्त आहे. या भागात पाकिस्तानी लष्कराच्या ६६ फ्रंटियर फोर्सची तैनाती असल्याची माहिती आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने किंवा चिथावणीने दहशतवादी भारतीय हद्दीच्या दिशेने आयईडी पेरण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला होता. भारतीय सीमेलगतचा हा परिसर कृष्णा खोऱ्याचा भाग असल्याचे सांगितले जाते. केरन सेक्टरमधील ताज्या घटनेबाबत अधिकृत तपशील समोर आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.