ग्रेटर नोएडा,
Five died after eating noodles at night उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातील नागला श्री पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राबूपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत महेश (वय ३७), त्यांची पत्नी ललिता (वय ३५) आणि त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. लाडू (वय ११), मिष्टी (वय ७) आणि साक्षत (वय ३) अशी मृत मुलांची नावे आहेत. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अन्न विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने घराची पाहणी केली आणि अन्नाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले. मृत महेश यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने आदल्या रात्री नूडल्स खाल्ले होते. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नूडल्स खाल्ल्यामुळेच पाचही जणांचा मृत्यू झाला, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने पाचही मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमागे अन्नातून विषबाधा किंवा अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत आहेत.