हिमाचल प्रदेश
himachal pradesh earthquake हिमाचल प्रदेशात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी नोंदवण्यात आली. बहुतांश नागरिक गाढ झोपेत असताना अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे जागे असलेल्या नागरिकांनाही भूकंपाचे हादरे जाणवल्याने अनेक जण घाबरून घराबाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र शिमला येथे होते, तर त्याची खोली जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर इतकी होती. त्यामुळे शिमला आणि सोलन या भागांत भूकंपाचा अधिक प्रभाव जाणवला. राज्यातील इतर भागांमध्ये तुलनेने सौम्य धक्के बसल्याचे समजते. अचानक झालेल्या या हालचालींमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली.
दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, हिमाचल प्रदेशासारख्या डोंगराळ भागांमध्ये भूकंपाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशा प्रदेशांत रिश्टर स्केलवर ५ तीव्रतेचा भूकंपही मोठ्या प्रमाणात नुकसान घडवू शकतो. त्यामुळे पहाटेच्या या भूकंपानंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.