होर्मुझमध्ये सुरुंगाला धडकले सुपरटँकर

कच्चे तेल वाहून नेत असताना अपघात

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |

तेहरान, 
hormuz-strait-oil-tanker-explosionहोर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये शनिवारी आणखी एक सुपरटँकर सुरुंगावर आदळल्याने मोठा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स नौदलाने सांगितले की, हे जहाज नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते. इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीने या घटनेचा तपशील ’एक्स’ या सोशल माध्यमावरील एका पोस्टमध्ये दिला आहे.
 
blast4
 
आयआरएनएच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, २० लाख बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल वाहून नेणारा एक सुपरटँकर शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असताना ताे इराणने पेरलेल्या सुरुंगावर आदळला. त्यामुळे स्फोट झाला आणि जहाजाला आग लागली. सुपरटँकरने आपल्या सर्व स्थान ट्रॅकिंग आणि रडार प्रणाली बंद केल्या होत्या. जहाजाने गुप्तपणे सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न केला़ त्याला अमेरिकी लष्कराचा पाठिंबा होता, असा आराेप आयआरजीसीने केला आहे. आयआरजीसीने यापूर्वी इशारा दिला आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे़ होर्मुझमधील इराणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाईल. तसेच जी जहाजे आपली नेव्हिगेशन प्रणाली बंद करतील त्यांनाही कारवाईला समाेरे जावे लागेल.
 
... तर अशी घटना टाळता आली असती
वृत्तानुसार, आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, जहाजाने आपली ट्रॅकिंग उपकरणे बंद केली आणि इराणी अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याऐवजी अमेरिकी लष्करी सुरक्षेवर अवलंबून राहिले. त्यामुळेच हा अपघात घडला. जर टँकरने स्थापित नियमांचे पालन केले असते आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला असता, तर अशी घटना टाळता आली असती, असेही आयआरजीसीने स्पष्ट केले़