आजपासून राज्यात शाळांमध्ये स्वच्छता मोहीम

विद्यार्थ्यांकडून वर्गणी घेण्यास मनाई

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |


मुंबई, 

maharashtra-school-cleanliness-drive-2026राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे. शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासह आवश्यक किरकोळ दुरुस्ती व देखभालीची कामे या मोहिमेत केली जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी किंवा निधी गोळा करण्यास मनाई करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले.

 
 
school
 
‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या भावनेतून शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविणे, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.मोहिमेचे दोन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक घेऊन स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामांचे नियोजन केले जाईल. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि क्रीडांगणाची पाहणी करून शाळानिहाय कृती आराखडा तयार करण्यात येईल.
 


मोहिमेची जबाबदारी मुख्याध्यापकाकडे

दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष कामे केली जातील. वर्गखोल्या, फरशी, भिंती, दरवाजे, खिडक्या, छत आणि पंख्यांची साफसफाई करण्यात येईल. स्वच्छतागृहे, पाण्याच्या टाक्या आणि परिसर स्वच्छ करून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केले जाईल. डास व कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासह विद्युत व्यवस्था, फर्निचर आणि पाणीपुरवठ्यातील किरकोळ त्रुटी दूर केल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. या कामांसाठी समग्र शिक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या एकत्रित अनुदानाचा वापर केला जाईल. मोहिमेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.