‘डिजिटल अरेस्ट’ : निवृत्त वृद्धाला ८ लाखांचा गंडा

सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,

nagpur digital arrest scam पोलिस आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी करून सेक्स रॅकेटच्या प्रकरणात अटक करण्याची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी बेलतरोडीतील ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीला आठ लाख रुपयांचा गंडा घातला. आरोपींनी वृद्धासह त्यांच्या पत्नीला फोनवरून ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून मानसिक दबावाखाली ठेवले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
nagpur digital arrest scam 75-year-old retired man cheated of rs 8 lakh
माधव नंदेश (७५, रा. बेलतरोडी) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, नंदेश्वर यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. नंदेश्वर हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपीने कायदेशीर कारवाईची भीती दाखवून नंदेश आणि त्यांच्या पत्नीला फोनवरून सतत दबावाखाली ठेवले. आपण एका गंभीर गुन्ह्याच्या तपासाच्या कचाट्यात सापडलो असून, आरोपीच्या परवानगीशिवाय कुठेही जाता येणार नाही, असा समज त्यांचा करून देण्यात आला. या धमक्यांमुळे वृद्ध दाम्पत्य घाबरले. आरोपीने सांगितलेल्या सूचनांनुसार नंदेश यांनी तेलंगणातील एका शाखेशी संबंधित बँकेच्या खात्यात ऑनलाइन आठ लाख रुपये पाठविले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. बेलतरोडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०८, ३१८(४) आणि ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे सायबर गुन्हेगारांचा सापळा!
लक्षात ठेवा : पोलिस किंवा सीबीआय फोन अथवा व्हिडिओ कॉलवरून कोणालाही ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाहीत.
पैसे पाठवू नका : अटक, चौकशी किंवा खाते पडताळणीच्या नावाखाली पैशांची मागणी झाल्यास सावध राहा.
खात्री करा : संबंधित तपास यंत्रणेच्या अधिकृत माध्यमातून माहितीची पडताळणी करा.
तातडीने तक्रार करा : सायबर फसवणूक झाल्यास किंवा पैशांचे व्यवहार झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा.