अल्पवयीन मुलाला कार चालविणे पडले महागात

वडिलांना ३० हजारांचा तर मुलाला १२ हजारांचा दंड!

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

nagpur minor caught driving car अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांना आता चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी सोनेगाव वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत न्यायालयाने वडिलांना ३० हजार रुपये, तर कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला १२ हजार रुपये दंड ठोठावला आहे. अल्पवयीन चालकावर स्वतंत्रपणे दंडात्मक कारवाई झाल्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे अल्पवयीनांच्या वाहन चालविण्याच्या गंभीर समस्येकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
 

nagpur minor caught driving car, court fines father rs 30,000 and son rs 12,000 
शहरातील एका नामांकित कार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाला कार चालविताना सोनेगाव वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे यांनी नियमानुसार या प्रकरणाची नोंद करून कारवाईसाठी न्यायालयात पाठविले. प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने मुलाच्या वडिलांना ३० हजार रुपये आणि मुलाला १२ हजार रुपये दंड ठोठावला. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी किंवा चारचाकी वाहने देण्याचे प्रकार शहरात वारंवार समोर येतात. वाहन चालविण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने अशा मुलांकडून अपघात होण्याचा धोका असतो. त्यातून केवळ संबंधित मुलाच्याच नव्हे, तर रस्त्यावरील अन्य वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हट्टापायी किंवा सोयीसाठी त्यांना वाहन चालविण्यास देणे टाळणे गरजेचे आहे.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, अन्यथा पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तरीही असे प्रकार सुरू असल्याने वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर आणि सोनेगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन चालकांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या पालकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे.
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसोबतच इतरांचे प्राण वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम कौतुकास्पद ठरत आहे. अशा कारवाया सातत्याने झाल्यास पालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन अल्पवयीनांच्या वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.
पालकांनो, नियम लक्षात ठेवा!
पालकांची जबाबदारी : अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका.
आर्थिक दंड : या प्रकरणात वडिलांना ३० हजार, तर मुलाला १२ हजार रुपये दंड.
अपघाताचा धोका : अल्पवयीन चालकामुळे स्वतःसह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
वाहतूक पोलिसांचे आवाहन : नियमभंग करणाऱ्यांविरोधातील कारवाईला सहकार्य करा; मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.