मुंबई
Pratap Sarnaik शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्णेकर यांच्यावर त्यांच्या कार्यालयात गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यानेही शिंदे यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, या प्रकरणातील मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे.
तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही’
पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचे सर्वांनाच दुःख असून, या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनेच्या पहिल्या दिवसापासून आपण कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे सांगत राम पूर्णेकर याच्याशी परवाच नव्हे, तर आजही संवाद झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका मांडताना सरनाईक म्हणाले की, आरोपींना भरचौकात फाशी झाली पाहिजे. या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण वैयक्तिकरीत्या सर्व वकील उभे करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.या प्रकरणावरून काही जणांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. काही लोकांनी घटनास्थळी येऊन राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज करून घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना केले.
ठाण्यात येण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही जे येत नाहीत, ते राजकारण करण्यासाठी ठाण्यात आले, अशा शब्दांत सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. या प्रकरणात राजकारण केले जात असल्याची टीका करताना आपण कौटुंबिक भावनेतून बोलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर Pratap Sarnaik यांच्या हत्येनंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आपण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता.आता प्रताप सरनाईक यांनीही कुटुंबीयांची भेट घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. एका बाजूला आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे या घटनेवरून सत्ताधारी आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.