दिल्ली
rajasthan kota expressway राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. २५ हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅव्हलर मिनी बस पुलावरून थेट नाल्यात कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १० प्रवासी जखमी झाले. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सीमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराडिया परिसरात ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त प्रवासी मध्य प्रदेशातील भोपाळ येथून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कराडिया टोल प्लाझा ओलांडल्यानंतर ही बस सुलतानपूरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी वेगाने धावणाऱ्या बसच्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यावरील मजबूत दुभाजक तोडून पुलाच्या मधल्या भागातून सुमारे २० फूट खोल नाल्यात कोसळली. या भीषण धडकेत बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर काढत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सीमलिया पोलीस, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) बचाव पथक आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. नाला सुमारे २० फूट खोल असल्याने जखमींना बाहेर काढताना बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. पोलिस आणि बचाव कर्मचाऱ्यांनी एकेक प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
या दुर्घटनेत चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अन्य तीन जणांनी रुग्णालयात नेत असताना प्राण गमावल्याचे सांगण्यात आले. जखमींना कोटा मेडिकल कॉलेजच्या नवीन रुग्णालयात आणि एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भोपाळहून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या प्रवासावर या दुर्घटनेमुळे दुःखाचे सावट पसरले आहे. चालकाला आलेली डुलकी आणि भरधाव वेग यांमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.