बांगलादेशात आगीचे तांडव! रिसॉर्ट जळून १० ठार

    दिनांक :17-Oct-2026
Total Views |
कॉक्स बाजार,
Resort catches fire in Bangladesh बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या रिसॉर्टला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता इनानी परिसरातील ‘टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्ट’ येथे ही दुर्घटना घडली. मरीन ड्राइव्हजवळील पटुआर्टेक बीचच्या परिसरात असलेल्या या रिसॉर्टमध्ये आग लागल्याची माहिती उखिया पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद अतीकुर रहमान मजुमदार यांनी दिली. दुपारी सुमारे १.३० वाजता अग्निशमन सेवेचे प्रवक्ते तलहा बिन जासिम यांनी या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची आणि ९ जण जखमी झाल्याची पुष्टी केली. ‘बीडीन्यूज २४’च्या वृत्तानुसार, जखमींना कॉक्स बाजार सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
2354668
 
रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी सबुकतागिन महमूद सोहेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी पाच जणांच्या शरीराचा सुमारे ५ टक्के भाग भाजला आहे. या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य एका व्यक्तीला पडल्यामुळे दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बांबू आणि लाकडाचा प्रामुख्याने वापर करून बांधण्यात आलेली ही तीन मजली इमारत बीच टाउनच्या प्रवेशद्वाराजवळ असून, कोलाटोलीपासून सुमारे २९ किलोमीटर अंतरावर आहे. वृत्तानुसार, आग लागली तेव्हा रिसॉर्टमध्ये सुमारे ३० जण उपस्थित होते. त्यापैकी चार ते पाच जण बाहेर पडण्यात यशस्वी झाले; मात्र उर्वरित लोकांची स्थिती आणि ते नेमके कुठे आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
 
कॉक्स बाजार अग्निशमन सेवेचे उपसहाय्यक संचालक सय्यद मोहम्मद मोर्शेद हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. कॉक्स बाजारचे उपायुक्त ए. मन्नान यांनी सांगितले की, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यांचे डीएनए नमुने घेतले जाणार आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. रिसॉर्टच्या स्वयंपाकघरातून आग लागली असावी, असा काहींचा संशय असला, तरी तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाने सांगितले.