नवी दिल्ली,
warrant against YouTuber Dhruv Rathi यूट्यूबर ध्रुव राठी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, दिल्लीतील साकेत न्यायालयाने २०१८ मधील मानहानी प्रकरणात त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ‘बीजेपी आयटी सेल पार्ट २’ या व्हिडिओशी संबंधित हे प्रकरण असून, विकास पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. १७ ऑक्टोबर रोजी ध्रुव राठी यांना न्यायालयात हजर राहायचे होते. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्यांना नव्याने समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. समन्स बजावण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याच्या अहवालानुसार, संबंधित वेळी ध्रुव राठी यांचे निवासस्थान बंद होते. त्यानंतर न्यायालयाने पुढील कारवाई करत जामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी मे २०१८ मध्ये ध्रुव राठी यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने आपली बदनामी करण्यासाठी एका व्यक्तीला पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राठी यांनी केल्याचे आरोप आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तो पुन्हा शेअर केला होता. याच व्हिडिओवरून विकास पांडे यांनी ध्रुव राठी यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, अद्याप न्यायालयाचा अंतिम निकाल झालेला नाही.
दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी तक्रारदार विकास पांडे यांनी न्यायालयाला सांगितले होते की, ध्रुव राठी सामान्यतः ऑस्ट्रियामध्ये राहतात आणि सध्या सीजेपीच्या (CJP) विरोधप्रदर्शनाशी संबंधित कारणासाठी भारतात आले आहेत. त्यांना समन्स बजावण्याच्या प्रक्रियेत गेल्या अनेक वर्षांपासून अडचणी येत असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले होते. न्यायालयीन नोंदींच्या आधारे, ध्रुव राठी यांना समन्स बजावण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. २३ जुलै २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे त्यांना पहिल्यांदा समन्स जारी करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा समन्स बजावण्याचे निर्देश देण्यात आले. आता जामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ३१ ऑक्टोबरच्या सुनावणीत या प्रकरणात काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.