ग्वाल्हेर,
14 devotees die in Gwalior मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर ट्रक उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात १४ भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी मृतांची संख्या १४ वर पोहोचल्याची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. नवरात्रीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनौरहून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर उतार आहे. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही पहाटे सुमारे दीड वाजता धान्याने भरलेला ट्रक तेथे आला. ट्रकने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो मंदिराच्या बाहेरील भिंतीला व प्रवेशद्वाराला धडकला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांना ट्रकची धडक बसली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. एकूण ३९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिली. जखमींपैकी काहींना गंभीर दुखापती झाल्या असून, इतरांवरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नवरात्रीच्या काळात बॅरिकेड्स आणि पोलीस तपासणी नाका असतानाही ट्रक या मार्गावर कसा आला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. ट्रकमध्ये नेमका कोणता बिघाड झाला आणि चालकाचे नियंत्रण कसे सुटले, हे स्पष्ट करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाला वाहनाची यांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.