न्यूझीलंडच्या मैदानावर संजू सॅमसनची परीक्षा

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
A Test for Sanju Samson वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेला २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, न्यूझीलंडमधील वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना फारच कमी वेळ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने व्यस्त वेळापत्रकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कमी कालावधीत तयारी करावी लागत असली, तरी अशा परिस्थितीत अनुभव आणि मानसिक तयारी महत्त्वाची ठरते, असे त्याने सांगितले.
 
 

A Test for Sanju Samson
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यानंतर प्रसारकांशी बोलताना संजू सॅमसनने सांगितले की, सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सराव आणि तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध वेळेचा पूर्ण उपयोग करणे आणि मानसिकदृष्ट्या सज्ज राहणे आवश्यक आहे. भारतीय संघ २० ऑक्टोबरला न्यूझीलंडमध्ये पोहोचणार असून, २१ ऑक्टोबरला सराव केल्यानंतर २२ ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे. तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी सुरुवातीच्या दोन-तीन चेंडूंवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अनुभवातून मिळालेल्या शिकवणीचा उपयोग करून परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, २०२८ मध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा भारतीय संघासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. संजू सॅमसनला आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये केवळ तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये दोन टी-२० आणि एका एकदिवसीय सामन्याचा समावेश आहे. मात्र, या तिन्ही सामन्यांत त्याला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडमध्ये त्याने अखेरचा टी-२० सामना २०२० मध्ये खेळला होता. त्या देशात खेळलेल्या दोन टी-२० सामन्यांत त्याच्या नावावर केवळ १० धावा आहेत. त्यामुळे आगामी मालिकेत संजूला आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे.