रियाद,
Alert for Indians in Saudi Arabia रियादस्थित भारतीय दूतावासाने रविवारी जारी केलेल्या विशेष मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भारतीय नागरिकांना सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या आपत्कालीन चेतावन्यांकडे लक्ष देण्याचे आणि अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. इराण-समर्थित हुथी बंडखोरांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आणि अमेरिकन सैन tने हुथी बंडखोरांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून सामायिक केलेल्या या निर्देशानुसार, राष्ट्रीय आपत्कालीन पूर्व चेतावनी मंचाद्वारे आपत्कालीन चेतावणी मिळाल्यावर नागरिकांनी शांत राहून तात्काळ कोणत्याही इमारतीमधील सर्वात सुरक्षित जागेवर जावे. खतरा पूर्णपणे टलेपर्यंत घराबाहेर किंवा इमारतींच्या बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून, खिडक्या आणि काचेपासून दूर राहतानाच बालकनी किंवा छतावर जाणे टाळावे. नागरिकांनी शक्यतो खिडक्यांपासून दूर असलेल्या घरातील आतील खोलीतच राहावे.
जर एखाद्या व्यक्ती उघड्यावर असेल, तर त्यांनी तात्काळ नजीकच्या इमारतीमध्ये आश्रय घ्यावा किंवा भक्कम भिंतीचा आडोसा धरावा. याशिवाय, गर्दीच्या आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे तसेच कोणत्याही प्रकारची छायाचित्रे किंवा व्हिडिओ न काढण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वाहन चालवत असताना चेतावणी मिळाल्यास नागरिकांनी पूल आणि उंच इमारतींपासून लांब रस्त्याच्या कडेला आपले वाहन थांबवावे.मक्का, मदीना, रियाद आणि पूर्व प्रांतामध्ये कोणत्याही धोक्याची किंवा आपत्कालीन परिस्थितीची नोंद झाल्यास नागरिकांनी ९११ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, तर सौदी अरेबियाच्या इतर भागांसाठी ९९८ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. यमनच्या हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियाला लक्ष्य करून सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जात असल्यामुळे सुरक्षेची चिंता कमालीची वाढली आहे. गेल्या १० ऑक्टोबर रोजी रियादच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. या गंभीर घटनेनंतर भारतीय दूतावासानं आपली सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा एकदा कठोरपणे लागू केली आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे, हवाई हल्ल्याच्या परिस्थितीत घरातच थांबणे आणि चालू घडामोडींशी संबंधित माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, प्रकाशित करणे अथवा शेअर करणे टाळण्याचे आवाहन दूतावासाकडून वारंवार केले जात आहे.