कोलकात्या,
ban on public gatherings in Kolkata कोलकात्यातील दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बहुबाजार परिसरात निर्बंध लागू केले आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त अजय नंद यांनी १८ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, संबंधित परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मोर्चे काढण्यास, धरणे किंवा निदर्शने करण्यास तसेच लाठी किंवा धोकादायक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कृतींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोलकाता पोलिसांच्या माहितीनुसार, बहुबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेज स्ट्रीट, सी. आर. अव्हेन्यू, कोलूटोला स्ट्रीट आणि ईडन हॉस्पिटल रोड यांनी वेढलेल्या परिसरात हे आदेश लागू राहतील. काही संघटनांकडून हिंसक आंदोलने होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत. निर्बंधांच्या काळात बेकायदेशीर जमाव, शस्त्रे बाळगणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या हालचालींवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
दरम्यान, कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात शनिवारी संध्याकाळी पावसादरम्यान गर्दी अचानक वाढल्याने चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत किमान १९ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून दखल घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासाच्या अनुषंगाने शनिवारी रात्री १४ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर पूजा आयोजकांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर शहरातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.