भीषण धडक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
बीड

beed accident बीड जिल्ह्यातील पंढरपूर–खामगाव पालखी महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बस आणि कारच्या जोरदार धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिंदेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. माजलगाव येथून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
 

beed accident 5 killed in bus-car collision on palkhi highway | maharashtra news 
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एक कुटुंब कारमधून तुळजापूरच्या दिशेने प्रवास करत होते. शिंदेवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारची एका बसशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसच्या पुढील भागाचेही तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातातील मृतांची नावे ओमकार महादेव गिरी (वय २४), गजानन महादेव नामदास (वय ३८), माऊली गजानन नामदास (वय ११), सोमनाथ बडे (वय २३) आणि अनिल आचार्य (वय ४०) अशी आहेत. एकाच अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये सुमारे ५० ते ७० जणांचा मृत्यू झाला आहे. या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने काम करावे, तसेच संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, सार्वजनिक beed accident कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षितता व्यवस्था नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी पावसाळ्यात मुंबईत उघड्या मेनहोलमुळे एका व्यक्तीचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती.
बीडमधील महामार्गावरील भीषण अपघात आणि पुण्यातील येरवड्यात घडलेली दुर्घटना यांमुळे रस्ते तसेच सार्वजनिक बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.