नागपूर,
bjp.news/kohale-nagpur-gradपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पहिल्या पसंतीच्या मतांतूनच विजयासाठी आवश्यक कोटा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावाही त्यांनी केला.
सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यापीठ शिक्षण मंचाच्या प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेत राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली. राज्य सरकारने पहिल्यांदाच प्राध्यापक भरती केली असून, या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि प्राध्यापकांकडे मतदानाचे आवाहन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वकील, डॉक्टर आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत गटातटांचे राजकारण
महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, आघाडीत सुरुवातीपासूनच मतभेद आणि गटातटांचे राजकारण आहे. याउलट भाजप आणि महायुतीचे घटक पक्ष नागपुरात एकत्रितपणे काम करत आहेत. महायुतीतील सर्व पक्ष समन्वयाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये किरण सरनाईक, पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांना महायुतीच्या घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दा उपस्थित केला. संविधानाला नाकारून चालणार नाही. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान असून, लोकशाहीत निवडणुकीच्या माध्यमातूनच निर्णय होतात, असे ते म्हणाले. संविधानाच्या चौकटीतच देशातील राजकीय निर्णय होतात आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवला पाहिजे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.